TOD Marathi

OBC आरक्षण : लातूरमध्येही BJP चे चक्काजाम आंदोलन, आंदोलनकर्त्‍यांची अटक- सुटका, संभाजीराव निलंगेकर; रमेश कराड यांचे नेतृत्व

टिओडी मराठी, लातूर, दि. 26 जून 2021 – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळावे, या मागणीसाठी लातूरमध्येही भाजपने चक्काजाम आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्‍यांना अटक केली. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे नेते, माजी पालकमंत्री, आमदार संभाजीराव निलंगेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी केले. तसेच कालांतराने पोलिसांनी अटक आंदोलनकर्त्‍यांची सुटका केली.

भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 26 जून) छत्रपती शाहू महाराज यांच्‍या जयंती निमित्‍ताने रद्द झालेले ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळावे, यासाठी आयोजित केलेल्या या चक्‍काजाम आंदोलनात भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ओबीसी समाजातील बारा बलुतेदार, आलुतेदार, बंजारा समाजातील महिला, धनगर समाजातील पारंपारिक वाद्यांसह बांधव, वासुदेव, आराधी, गोंधळी, पोतराज, वाघ्या मुरळी आदी बांधव पारंपारीक वेशभूषेत सहभागी झाले होते.

सकाळी 11 वाजता सुरू झालेले आंदोलन चार साडेचार तास चालू राहीले. यादरम्यान आरक्षण आमच्‍या हक्‍काचे, नाही कोणाच्‍या बापाचे, बारा बलुतेदारांना आरक्षण मिळालेच पाहिजे, वसुली सरकार हटाव, ओबीसी बचाव, हक्‍काचे आरक्षण द्या नाहीतर खुर्च्‍या खाली करा, आघाडी शासनाची खेळी, ओबीसी आरक्षणाचा बळी अशा अनेक घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी संभाजीराव पाटील निलंगेकर म्‍हणाले, ओबीसी समाजाच्‍या आरक्षणाला धक्‍का न लावता भाजप सरकारने मराठा आरक्षण दिले होते. राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात गृह, आरोग्‍य, कृषी यासह विविध विभागामध्ये भ्रष्‍टाचार झाला आहे. हा भ्रष्‍टाचार लपविण्‍यासाठी जाणीवपूर्वक प्रश्‍न निर्माण केले जात आहेत.

मराठा आणि ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण न्‍यायालयात व्‍यवस्थित बाजू मांडली नसल्‍याने रद्द झाले आहे. या दोन्‍ही समाजाला आरक्षण मिळावे, ही भाजपाची भूमिका आहे. जोपर्यंत हे आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू राहील, असा इशारा दिला.

आमदार रमेश कराड म्‍हणाले, आघाडी सरकारच्‍या कार्यकाळात शेतकरी, कष्‍टकरी, गोरगरीब आणि कोणताच समाज समाधानी नाही. नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वात केंद्र शासनाने सर्वसामान्‍यांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना सुरू केल्‍यात. पालकमंत्री कसा असावा? हे संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी विकासाच्‍या योजना मंजूर करून आणि विविध प्रकल्‍प कार्यान्‍वीत करून दाखवून दिले आहे. काँग्रेसवाल्‍यांना स्वच्छतागृह देखील बांधता आली नाहीत.

पैशाच्‍या जोरावर उमेदवारी मिळू शकते. मात्र, गोरगरीबांचा आशिर्वाद मिळणार नाही. लातूर ग्रामीणचे आमदार कोणाच्‍या विरोधात निवडूण आलेत ? नोटाच्‍याच ना?. येणाऱ्या निवडणुकीत गोरगरीब सर्वसामान्‍य जनतेच्‍या आशिर्वादाने तुमची पाठ लावल्‍याशिवाय राहणार नाही.

यावेळी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, देविदास काळे, भागवत सोट, स्वाती जाधव, प्रेरणा होनराव, व्यंकट पन्हाळे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन शैलेश गोजमगुंडे यांनी केले.

यावेळी भाजपचे शैलेश लाहोटी, प्रदीप पाटील खंडापूरकर, मनीष बंडेवार, अजित पाटील कव्हेकर, दिग्विजय काथवटे, विजय काळे, गोविंद नरहरे आदी व्यासपीठावर होते. अटक आंदोलनकर्त्‍यांची पोलिसांनी सुटका केली.