देशात मोटारसायकल, कार किंवा अन्य कोणतंही वाहन चालवणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. यानुसार लवकरच देशातील सर्व जुन्या वाहनांमध्ये नवीन नंबर प्लेट लावली जाईल. यातून जीपीएस आणि अत्याधुनिक सिस्टिमद्वारे वाहनं मॉनिटर करता येतील. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकार देशातील टोल प्लाझा सिस्टिम हटवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने उचललेलं हे केंद्र सरकारचं मोठं पाऊल आहे. गडकरी यांनी सांगितलं आहे की, नवीन वाहनांमध्ये टॅम्पर प्रूफ हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्सचा (HSRPs) वापर २०१९ पासून सुरू करण्यात आला होता. ज्याद्वारे सरकारी एजन्सी वाहनांबद्दलची सर्व प्रकारची माहिती मिळवू शकतील. आता जुन्या वाहनांसाठी देखील अशीच नंबर प्लेट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या दोन टोल प्लाझांमधील अंतर ६० किमी असलं तरी पूर्ण शुल्क भरावं लागत आहे. परंतु महामार्गावर केवळ ३० किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याचाच वापर केला असेल तर नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आता तुमच्याकडून अर्ध शुल्क घेतलं जाईल. नितीन गडकरी म्हणाले की, केंद्र सरकारचा प्रयत्न आहे की, देशाला टोल प्लाझामुक्त करायचं आहे. टोल प्लाझावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणार नाहीत, त्यामुळे प्रदूषण होणार नाही. तसेच लोकांचा प्रवासाचा वेळ देखील कमी होईल. यामुळे सरकार, पर्यावरण आणि नागरिकांनाही फायदा होणार आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे वाहनचालकांच्या बँक खात्यातून थेट पैसेही कापले जाऊ शकतात.
नितीन गडकरी यांनी सांगितलं की, भारतातली जवळपास ९७ टक्के वाहनं आधीपासूनच फास्टॅग (Fastag System) वर आधारीत आहेत. भारतीय रस्त्यांच्या पायाभूत सुविधा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अमेरिकेच्या बरोबरीच्या असतील. काही दिवसांपूर्वी गडकरी असंही म्हणाले होते की, येत्या काही काळात आपल्या देशातील रस्ते हे अमेरिकेसारखे होतील. केंद्र सरकार त्या दृष्टीने वेगाने काम करत आहे.
दुचाकी चालकांनी प्रवासादरम्यान हेल्मेट वापरणं आपल्या देशात बंधनकारक आहे. हा नियम दुचाकीचालकांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आला आहे. मात्र आता हेल्मेट घातलं असलं तरी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. नवीन ट्रॅफिक नियम 194D MVA अनुसार तुम्ही दोषपूर्ण हेल्मेट घातलं असेल तर तुमच्याकडून १००० रुपयांचा दंड वसूल केला जाईल. दोषपूर्ण किंवा बीआयएस मार्क नसलेलं हेल्मेट वापरलं तरी दुचाकी चालकाकडून दंड वसूल करण्याची यात तरतूद आहे. ट्रॅफिक चालान ऑनलाईन भरण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे.