TOD Marathi

मुंबई : 

अधिवेशनाच्या पूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलं (Mohit Kamboj Tweet) आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक, शिवसेनेचे नेते संजय राऊत तुरुंगात असताना राष्ट्रवादीचा बडा नेता त्यांच्यासोबतच लवकरच तुरुंगात दिसेल, असा दावा करताना मोहित कंबोज यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) यांच्याकडे होता. दुसरीकडे अधिवेशन काळात असे आरोप करुन विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यातं हे कारस्थान आहे, असं म्हणत विरोधी पक्षही जोरदार आक्रमक झाला आहे. पण त्याचवेळी ,”मोहित कंबोज यांच्या ट्विटचा अर्थ खोल आहे. त्यांच्याजवळ पुरावे असतील म्हणूनच त्यांनी ट्विट केलं असेल. त्यांचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे. तो नेता कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्या नेत्याची सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडण्यासंबंधीची पावलं उचलली जातील”, असं भाजपच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे. प्रवीण दरेकर, गिरीश महाजन आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना अजित पवार यांची ती फाईल पुन्हा उघडणार असल्याचं सूतोवाच केलंय.

मोहित कंबोज यांनी आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात विरोधी पक्षनेते अजित पवार हे अडचणीत येणार असल्याची चर्चा सुरु झाले. आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. यावेळी सिंचन प्रकल्पांची कामे देताना हजारो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप अजित पवार यांच्यावर झाले होते. मात्र, २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे ८० तासांचे सरकार स्थापन झाले होते तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सिंचन घोटाळ्याची केस बंद केली होती. मात्र, मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर आता ही केस पुन्हा उघडण्याची दाट शक्यता आहे.