TOD Marathi

मुंबई :

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या या अपघाताच्या चौकशी प्रकरणात आता दररोज नवनवी माहिती समोर येत असल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढत जात आहे. सध्या पोलिसांकडून विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम (Eknath Kadam) याची कसून चौकशी केली जात आहे. अशातच आता विनायक मेटे यांच्या दुसऱ्या चालकाने केलेल्या खुलासा यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Vinayak Mete) यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप केले आहे. आता मेटे यांचे दुसरे चालक समाधान वाघमारे यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा, त्याच्यामधून बरंच काही बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया समाधान वाघमारे यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून विनायक मेटे यांचा घात करण्याचा प्लॅन होता का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

समाधान वाघमारे म्हणाले की, ‘जर त्या दिवशी मी गाडीवर असतो तर मी स्वतःचा जीव दिला असता. मात्र, साहेबांना काहीही होऊ दिलं नसतं. मला वाटतं शिक्रापूरच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर यामध्ये बरंच काही मिळू शकतं’. त्यांच्या या विधानामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत गुंतले आहेत? अशा शंका समोर येतात.

समाधान वाघमारे हे विनायक मेटे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. मात्र १४ तारखेला त्यांच्या वडिलांचे वर्षश्राद्ध असल्यामुळे ते सुट्टीवर होते. समाधान वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्टला ते मेटेंना घेऊन गडबडीत मुंबईकडे निघाले होते. यावेळी शिक्रापूरलगत एका इर्टिगा गाडीने दोन वेळा चांगलाच कट मारला. त्यावेळी मी मेटे साहेबांना म्हणालो गाडी थांबवू का? मात्र साहेब म्हणाले ते दारू प्यायले असतील, त्यामुळे तू थांबू नकोस. यावेळी आमची गाडी फक्त ८० च्या स्पीडवर होती. तर गाडीमध्ये मी, मेटे साहेब, बॉडीगार्ड ढोबळे आणि कार्यकर्ता अण्णा मायकर होतो,’ अशी माहिती त्यांनी दिली.