TOD Marathi

मुंबई :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं. (Statement of Bhagatsingh Koshyari about Shivaji Maharaj) गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या विधानावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्रातल्या विविध शहरांत त्यांच्याविरोधात आंदोलने होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नव्या युगाचे आदर्श नितीन गडकरी आहेत, अशी तुलना राज्यपालांनी केल्यानंतर स्वत: नितीन गडकरी यांनी मात्र आपल्या खास शैलीत खमकी प्रतिक्रिया दिली आहे. (Union Minister Nitin Gadkari video talking about Shivaji Maharaj) एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या आयुष्यातील स्थान, शिवरायांचं मोठेपण आणि त्यांच्या जीवनावर असलेला शिवाजी महाराजांचा प्रभाव अधोरेखित केला.

नितीन गडकरी यांच्या कार्यालयीन ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत गडकरी म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो! आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचं आदर्श आहे. यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा.. निश्चयाचा महामेरु.. बहुत जणांसी आधारु… अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी… वेळ पडली तर आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारा राजा होता…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले होते?

आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? असे गुरुजन विचारायचे, आजूबाजूचे लोक विचारायचे. मग कुणी सुभाषबाबू, कुणी नेहरू सांगत असायचे. पण आता तुमचे आदर्श कोण असं जर विचारलं तर कुठेही जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला प्रेरणादायी आयडॉल मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे आदर्श झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य करुन राज्यपाल कोश्यारींनी वाद ओढावून घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात औरंगाबादमध्ये बोलताना राज्यपालांनी हे वक्तव्य केलं होतं.

नितीन गडकरी यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून एकप्रकारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आरसा दाखवला आहे.