TOD Marathi

Minister आदित्य ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली !; शिवसैनिकांनी नोंदवला निषेध, राणे म्हणाले, ..तर मी माझे शब्द मागे घेतो

टिओडी मराठी, मुंबई, दि. 7 जुलै 2021 – पावसाळी अधिवेशन काळात मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार नितेश राणे यांची जीभ घसरली. ‘ते बाळासाहेबांचा नातू आहे का नाही हे सांगू शकत नाही?’ असे म्हणत यासाठी ‘त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल’, असं वक्तव्य राणे यांनी केलं होतं. यानंतर आता राणे यांनी भावना दुखावल्या असतील तर, मी माझे शब्द मागे घेतो, असं ट्विट केलं आहे.

दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन झाले. गदारोळ, धमकी, धक्काबुक्की आदींमुळे तालिका अध्यक्ष यांनी आलेला ठराव मंजूर केला. यावरून चिडलेल्या भाजपच्या नेत्यांनी सरकार आणि मंत्र्यावर हल्लाबोल केला.

अधिवेशन काळात मंगळवारी भाजप आमदारांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. आणि विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून प्रति विधानसभा सुरु केली होती. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत माईक आणि स्पीकर जप्त केले.

त्यानंतर पत्रकार कक्षात हे कामकाज सुरु झाले. त्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांची जीभ घसरली. ते बाळासाहेबांचा नातू आहे का नाही हे सांगू शकत नाही? असे म्हणत यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असं नितेश राणे म्हणाले होते.

यानंतर मुंबईत त्याचे पडसाद उमटले. शिवसैनिकांकडून आंदोलन करून याचा निषेध नोंदवला. नितेश राणे यांच्या विरोधात मुंबईत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर नितेश राणे यांनी ‘भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट केलं.

नितेश राणे यांनी तोंड सांभाळून बोलावं :
नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतील शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी नितेश राणे यांचा निषेध करत आंदोलन केलं. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा पुतळा जाळला.

यावेळी पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांत झटापट झाली. नितेश राणे यांनी माफी मागावी आणि इथून पुढे बोलताना तोंड सांभाळून बोलावं, अशी मागणी शिवसैनिकांच्या वतीने केली.

नितेश राणेंच ट्विट :
विधानसभेबाहेरील माझ्या कालच्या भाषणात मी आदित्य ठाकरेबद्दल उल्लेख केला होता. तो बर्‍याच जणांनी चुकीच्या पद्धतीने घेतला. जर याने एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो, असं ट्विट नितेश राणे यांनी केलंय.