TOD Marathi

अमरावती: बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या वतीने राजापेठ उड्डाणपुलावर बसविण्यात आलेला पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अमरावती महापालिकेने हटवला आहे. त्यानंतर आता खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या घरासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

संतप्त झालेल्या नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याची राजापेठ उड्डाणपुलावर स्थापना करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून या पुतळ्यासाठी शिवभक्त जागेची परवानगी मागत होते. मात्र, अद्यापही ती परवानगी देण्यात आलेली नाही. त्यानंतर शिवभक्तांनी तो पुतळा स्थापन केला. तो पुतळा या ठाकरे सरकारने हटवला आहे.पुढे त्यांनी म्हटलंय की, शिवाजी महाराजांवर बोललेलं बाळासाहेब ठाकरेंना सहन व्हायचं नाही. पण आज त्यांचेच सुपुत्र जे मुख्यमंत्री पदावर आहेत. त्याच महाराष्ट्रात आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी परवानगी मिळत नाही. तो पुतळा मध्यरात्री हटवण्याची कारवाई तुम्ही करता? शिवभक्तांना तुरुंगात टाकत आहात? आज महाराष्ट्र या परिस्थितीत उभा आहे की, लोकप्रतिनिधींना महाराजांच्या पुतळ्यासाठी भांडावं लागतंय…! कुठे गेले आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार? कुठे गेले त्यांचे आदर्श? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.