TOD Marathi

मुंबई |  शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात शासन आपल्या दारी कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते. त्याची पोस्टही त्यांनी आपल्या अधिकृत पेजवरून केली. यावरुन नरेश म्हस्के यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

कालपर्यंत हे लोक शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका करत होते. मात्र, आज तेच लोक कार्यक्रम घेत आहेत. ही सरळ-सरळ कॉपी आहे. मुख्यमंत्र्यांचा झपाटा बघून, उपक्रमाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघून तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. म्हणूनच तुम्ही कॉपी करताय. हे म्हणजे दुसऱ्याच्या तव्यावर आपली पोळी भाजायचा प्रकार असल्याची टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.

हेही वाचा …मणिपूरमधील हिंसा ही मानवी शोकांतिका! सोनिया गांधींनी व्यक्त केली खंत”

दरम्यान, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे येथील रामचंद्र पॅलेसमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे व हवेली तहसीलदार कार्यालय अंतर्गत राबवलेल्या या उपक्रमात विविध योजना व शासकीय दाखले एकाच ठिकाणी मिळणार असल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी या पोस्टद्वारे दिली होती.