TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 15 जून 2021 – भारतात आयटी क्षेत्रातलं मोठं नाव असलेले इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती अन ॲमेझॉनची संयुक्त कंपनी ‘कर’ वादात अडकली आहे. 5.5 दशलक्ष पाउंड शुल्क भरण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, कराबद्दलचा हा वाद नेमका कशाबद्दल आहे ?, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही, असे कंपनीच्या वतीने सांगितले आहे.

एन. आर. नारायण मूर्ती आणि अमेरिकेतली रिटेलर कंपनी असलेली ॲमेझॉन यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनीने भारतीय कर यंत्रणेच्या नियमांतून पळवाट काढल्याचा आरोप केला जातोय.

भारतीय यंत्रणांकडून त्या कंपनीकडे सुमारे साडेपाच दशलक्ष पाउंड एवढ्या कराची मागणी केली आहे; मात्र त्याबद्दल कंपनीकडून खटला लढवला जातोय. भारतातल्या कॉम्पिटिशन कमिशनने या संदर्भात ॲमेझॉनची पुन्हा चौकशी करण्यास परवानगी दिलीय. ब्रिटनमधल्या ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने याबद्दलचे वृत्त दिलंय.

युके चॅन्सेलर ऋषी सुनक यांचे सासरे म्हणजे एन. आर. नारायण मूर्ती. ॲमेझॉन या कंपनीशी वार्षिक एक अब्ज पाउंडांचा करार करून त्यांनी एक कंपनी उभी केलीय. या कंपनीच्या कारभारामुळे परदेशी मालकीसंदर्भातल्या भारतीय नियमांचं उल्लंघन होत आहे, अशी शक्यता आहे.

तसेच छोट्या व्यापाऱ्यांनी त्यांच्यावर अन्याय होत आहे, असा दावा केला आहे, असे ‘गार्डियन’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटलंय. मात्र, आपण स्थानिक नियमांचं संपूर्णपणे पालन केलं आहे, असे अॅमेझॉनचं म्हणणं आहे.

मागील आठवड्यात झालेल्या जी-7 देशांच्या चर्चेत जगातल्या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांच्या अर्थमंत्र्यांनी तंत्रज्ञान कंपन्यांना अधिक कर भरावा लागेल. अशा पद्धतीच्या जागतिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यानंतर ॲमेझॉन आणि नारायण मूर्ती यांच्या संयुक्त उपक्रमाच्या कराचा मुद्दा पुन्हा चर्चेला आलाय.

मालाची साठवणूक करून ऑनलाइन किरकोळ विक्री करण्यास परदेशी कंपन्यांना भारतात बंदी आहे. त्यामुळे Amazon.in ही वेबसाइट मार्केटप्लेस म्हणून चालवली जाते. तिथे भारतीय किरकोळ विक्रेते त्यांची प्रोडक्ट्स उपलब्ध करत असतात. त्या माध्यमातून विक्री झाल्यास ॲमेझॉनला ते शुल्क मोजतात.

Amazon.in वर जे विक्रेते आहेत, त्यापैकी क्लाउडटेल ही सर्वांत बिग कंपनी आहे. नारायणमूर्ती यांच्या कुटुंबीयांतर्फे चालवल्या जाणाऱ्या इन्व्हेस्टमेंट फर्मची या क्लाउडटेल कंपनीमध्ये 76 टक्के गुंतवणूक आहे. उर्वरित 24 टक्के गुंतवणूक ॲमेझॉनची आहे.

या कंपनीतल्या चीफ एक्झिक्युटिव्ह आणि फायनान्स डायरेक्टर या दोन सर्वोच्च पदांवर ॲमेझॉनची लोकं नेमली आहेत. तसेच प्रिओन ही क्लाउडटेलची होल्डिंग कंपनीही ॲमेझॉनच्या माजी मॅनेजर्सकडूनच चालवली जातेय.

क्लाउडटेलने मागील चार वर्षांत अगदी अल्प प्रमाणात टॅक्स भरला आहे. व्याज आणि दंड या रूपाने  ‘डायरेक्टोरेट जनरल ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इंटेलिजन्स’कडून 5545 लाख म्हणजेच 5.5 दशलक्ष पाउंड एवढं शुल्क भरण्याची नोटीस बजावलीय. क्लाउडटेलच्या ताज्या अकाउंट्स नोटमध्येही अशी कारणे दाखवा नोटीस आल्याचा उल्लेख आहे.

कराबद्दलचा हा वाद नेमका कशाबद्दल आहे ?, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही, असे कंपनीच्या वतीने सांगितले आहे.