TOD Marathi

मुंबई | विधानसभा अधिवेशनावेळी विविध सामाजिक संघटनांचे मोर्चे विधिमंडळावर धडकत असतात. आज ( २५ जुलै ) उमेद या महिला बचत गटाच्या मोर्चाचे आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत असताना मंत्री गुलाबराव पाटील हसले. यावरून नाना पटोले यांनी गुलाबराव पाटील यांना सुनावलं आहे.

“आझाद मैदानावर मोर्चांचं प्रमाण कमी होत नाही. महिला, कलाकार आणि विविध मोर्चे आझाद मैदानावर येत आहेत,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

यावेळी गुलाबराव पाटील हसत होते. त्यावरून नाना पटोले यांनी गुलाबराव पाटलांचा समाचार घेतला आहे. “गुलाबराव पाटील हसण्याचं कारण नाही. मोर्चे येणं हे सरकारचं अपयश आहे. मला बोलायला लावू नका. मी विषय मांडत असताना त्रास देऊ नका,” असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

हेही वाचा ” …काँग्रेस आमदाराचं शिंदे – पवारांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले…

नाना पटोले म्हणाले की, “उमेद बचत गटातील महिलांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. यापूर्वीही त्यांचे बचत गटातील महिलांचे पैसे देण्यात आले नव्हते. मानधन वाढवण्याचा आणि विविध प्रश्न घेऊन उमेद बचत गटातील महिलांचा मोर्चा आझाद मैदानावर आला आहे.”

“महिला सक्षमीकरणाची आपण चर्चा करतो. ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हा उमेदचा सर्वात महत्वाचा भाग आहे. असंघटित महिलांना उद्योगपती बनवण्याचं स्वप्न सरकार बघत असेल, तर आझाद मैदानावर आलेला उमेदच्या मोर्चाच्या मागण्या मंजूर केल्या पाहिजेत,” अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.