राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून पडद्यामागे सुरु असलेल्या हालचालींना आता यश येताना दिसत आहे. काही वेळापूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी मंत्री छगन भुजबळ, मंत्री सुनील केदार, शिवसेनेचे अनिल देसाई, आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यायची तयारी दर्शविली का ? याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी संवाद साधत असताना ते म्हणाले की ही निवडणूक बिनविरोध झाली तर चांगलं होईल. देवेंद्र फडणवीस हे मॅच्युअर्ड नेते आहेत. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. मात्र, आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यसभा निवडणुकीबाबत काही मार्ग निघाला तर त्याचे स्वागत आहे. कारण या निवडणुकीनिमित्ताने महाराष्ट्रातील वातावरण आणखी बिघडू शकते. या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. मतांसाठी आमदारांना आमदारांना कोण पैशांचे प्रलोभन दाखवत आहे, कोट्यवधींचे आकडे समोर येत आहेत. हा एकप्रकारचा आर्थिक गैरव्यवहारच आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी या सगळ्याची चौकशी केली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
यामुळे आता राज्यसभा निवडणुकीत काय तोडगा निघतो, महाविकास आघाडी किंवा भाजपा यापैकी कोण आपला एक उमेदवार मागे घेतो हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.