TOD Marathi

भाजपाचे दिवंगत जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतीदिन. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी शपथ घेतली होती. 3 जून 2014 रोजी त्यांचं दिल्लीत अपघाती निधन झालं. त्यांच्या स्मृतीदिनी राज्यातील सर्व राजकारण्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहत भावूक पोस्ट केली आहे.

मंत्री धनंजय मुंडे हे स्व. गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी गोपीनाथ गडावर आले होते. “गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न मी सत्तेत बसून पूर्ण करत आहे. ते असते तर आज चित्र वेगळं असतं.” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर “त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. त्यांचा आवाज आजही कानात घुमतो आहे.” असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी एक ट्विट केलंय. त्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “अजूनही आठवतो तो 3 जूनचा काळा दिवस… आजही असं वाटतं अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर…” अशी भावनिक पोस्ट करून त्यांनी आपले चुलते गोपीनाथ मुंडे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. “अप्पा तुम्ही नाहीत, पण तुमची चेतना आजही आमच्यात आहे, तुमचा आवाज आजही कानात घुमतो!”

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपाला महाराष्ट्रात भरघोस यश मिळालं होतं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकानंतर भाजपा आणि शिवसेना युतीने महाराष्ट्रात यश मिळवलं होतं. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवलं जात होतं. पण त्याआधी गोपीनाथ मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री म्हणून दिल्लीत शपथ घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्रात परत येत असताना दिल्लीत त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या घटनेला आज आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.