टिओडी मराठी, पुणे, दि. 20 जून 2021 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ‘संयुक्त पूर्व परीक्षा गट- ब’ ही परीक्षा मागील वर्षापासून करोनामुळे सुमारे 5 वेळा पुढे ढकललेली आहे. आता तातडीने ही परीक्षा घ्यावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिला आहे.
महाराष्ट्र शासनाने एमपीएससी परीक्षांबाबत लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. परीक्षा वारंवार पुढे गेल्यामुळे उमेदवाराचे वय वाढते, आर्थिक अडचणी, मानसिक ताणतणाव, कौटुंबिक त्रास, सामाजिक दबाव अशा विविध अडचणींना या उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहे.
मागील संयुक्त पूर्व परीक्षा मार्च 2019 मध्ये झाली आहे. त्यानंतर सन 2020 मध्ये होणारी परीक्षा अद्याप देखील झालेली नाही. याचा देखील सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. जर अशा परीक्षा पुढे ढकलल्या तर एमपीएससीकडून परीक्षार्थींना वय, फी आदी मध्ये सवलत देणे आवश्यक आहे, असे देखील मत उमेदवार व्यक्त करीत आहेत.