TOD Marathi

जनतेची दिशाभूल करत केंद्राने सरकारी मालमत्ता कवडीमोल दराने विकायला काढल्या – Sachin Pilot

टिओडी मराठी, जयपूर, दि. 26 ऑगस्ट 2021 – देशाने मागील 70 वर्षात ज्या संस्था आदी उभे केले, त्या मालमत्ता आता केंद्र सरकारने कवडीमोल दराने विकायला काढल्यात. या सरकारने सध्या अडचणीमध्ये आलेल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांना मदत करण्याचे काम करायचे सोडून हा भलताच मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे देश पूर्ण मोडकळीला येण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी खरमरीत टीका राजस्थानातील कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

भाजपचे सरकार विभाजनवादी राजकारण करत आहे. तसेच लोकांची सर्वच बाबतीत पद्धतशीर दिशाभूल करीत आहे, असा आरोपही त्यांनी केलाय.

राजस्थानातील कॉंग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले, केंद्र सरकारने नव्या मॉनिटायझेशन पॉलित देशातील रेल्वे, विमानतळ, रस्ते, स्टेडियम अशा सर्व मालमत्ता कवडीमोल किंमतीने विकायला काढल्या आहेत. त्या मालमत्ता त्यांच्या मर्जीतील काही मोजक्‍याच लोकांच्या ताब्यात जाणार आहेत.

देशात महागाई आणि इंधन दरवाढ सतत होत आहे. तसेच बेरोजगारी शिखरावर पोहोचलेली असताना हे लोक जनआर्शिवाद यात्रा काढत आहेत, याचीही त्यांनी खिल्ली उडवली आहे. राजस्थानामध्ये सध्या सहा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी दौसा येथे घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली.