TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 26 ऑगस्ट 2021 – ज्येष्ठ आयपीएस अधिकारी राकेश आस्थाना यांना नियमबाह्य पद्धतीने दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदावर नियुक्त केले आहे, असा आरोप करीत त्यांच्या नियुक्तीच्या विरोधातील एक याचिका दिल्ली हायकोर्टात प्रलंबीत आहे, पण, त्यावर हायकोर्टाने निर्णय दिलेला नाही. या प्रकरणी दोन आठवड्याच्या आत निर्णय द्यावा, अशी सूचना आता सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

राकेश आस्थाना हे गुजरात केडरचे अधिकारी आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाडके आधिकारी आहेत, अशी त्यांची प्रतिमा आहे. ते 31 जुलै रोजी निवृत्त होणार असताना त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या चार दिवस अगोदर मुदतवाढ देऊन दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदी विराजमान केले आहे.

ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला. अशा अधिकाऱ्याला कोणतीही नवीन नियुक्ती द्यायची नाही, असा संकेत आहे. पण, तो डावलून आस्थाना यांना दिल्लीचे आयुक्त केले आहे. त्यांची ही नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍडव्होकेट प्रशांत भूषण यांनी केली.

त्यावर सरकारी वकिल तुषार मेहता यांनी या प्रकरणामध्ये निर्णय घेण्यास हायकोर्टाला मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली होती. यात सरकारला आपली भूमिका ठरवण्यास काही काळ लागू शकतो म्हणून त्यांनी ही विनंती केली होती. ती मान्य करून आता दोन आठवड्यांच्या आता यावर निर्णय करण्यास सांगण्यात आले आहे.