TOD Marathi

टिओडी मराठी, ग्वाल्हेर, दि. 26 ऑगस्ट 2021 – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशामुळे मध्यप्रदेश कॉंग्रेसमधील गटबाजी संपुष्टामध्ये आली. मात्र, आता मध्यप्रदेश भाजपमध्ये तीन गट पडलेत, असा दावा त्या राज्याचे माजी मंत्री जयवर्धन सिंह यांनी बुधवारी केला आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे पुत्र असणाऱ्या जयवर्धन यांनी येथे पत्रकारांशी बोलताना ज्योतिरादित्य यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. ज्योतिरादित्य असेपर्यंत कॉंग्रेसमध्ये गटबाजी सुरू होती. आता भाजपमध्ये गटबाजीला उधाण आलं आहे. त्या पक्षात शिवराज, महाराज आणि नाराज असे गट तयार झालेत, अशी खिल्ली जयवर्धन यांनी उडवली.

भाजपमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मानणारा एक गट असून ज्योतिरादित्य यांचा उल्लेख महाराज म्हणून केला जातो. त्यांच्या समर्थकांचा दुसरा गट भाजपमध्ये आहे. तर, ज्योतिरादित्य यांच्या प्रवेशामुळे त्या पक्षात एक गट नाराज आहे, असे जयवर्धन यांनी सूचित केले आहे.

ज्योतिरादित्य यांनी गेल्या वर्षी काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकार कोसळले. त्यानंतर त्या राज्यात भाजपने सरकार स्थापन केले आहे.