मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि मलिंडा घटस्फोट घेणार; मात्र, ‘त्या’ फौंडेशनचे काम एकत्ररित्या करणार

टिओडी मराठी, दि. 4 मे 2021 – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्ती असा परिचय असलेले बिल गेट्स व त्यांची पत्नी मेलिंडा यांनी २७ वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. या दोघांनी संयुक्तरित्या या संदर्भात ट्विटरवर दिलेल्या निवेदनानुसार त्यांना या पुढे पती-पत्नी म्हणून एकत्र राहणे शक्य नाही. त्यामुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहे, असे म्हटले आहे.

ट्विटरवर बिल गेट्स म्हणतात, दीर्घ चर्चा व वैवाहिक नातेसंबंध यांचा विचार करून आम्ही वैवाहिक जीवन संपविण्याचे ठरविले आहे. मागील २७ वर्षामध्ये आम्ही आमच्या तीन मुलांना व्यवस्थित सांभाळून त्यांना मोठे केलं आहे. आम्ही दोघांनी मिळून एका फौंडेशनची स्थापना केलीय.

तसेच त्यातून जगभरातील लोकांना आरोग्यपूर्ण व चांगले जीवन मिळावे, यासाठी मदतीचा हात दिला जातो. आम्ही घटस्फोट घेत असलो तरी या फौंडेशनचे काम एकत्ररित्या करणार आहे.

पती-पत्नीचे नाते संपवून नव्या जीवनाची सुरवात करताना बिल यांनी त्यांच्या कुटुंबाचे खासगीपण अबाधित राहावे, अशी विनंती लोकांना केलीय. बिल गेट्स आणि मेलिंडा यांची ओळख १९८७ मध्ये झाली होती.

न्यूयॉर्क एक्स्पो ट्रेड मेळ्यात बिल गेट्स यांनी मेलिंडा यांना कार पार्किंगमध्ये डेटिंगसाठी विचारले होते. तेव्हा मेलिंडा यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र, बिल गेट्स यांनी मेलिंडा यांचा पाठपुरावा केला. अखेर १९९३ मध्ये त्यांनी एंगेजमेंट केली आणि १९९४ मध्ये लग्न केले होते.

Please follow and like us: