TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 1 जून 2021 – मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, तेव्हा आम्ही समंजसपणाची भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यावेळी महाराष्ट्रात उद्रेक झाला नाही, असे स्पष्ट करताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य मार्ग काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग दौऱयावर असलेल्या संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याची तारीख 4 जून आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर मार्ग काढू, असे सांगितले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नक्कीच यातून योग्य मार्ग काढतील, असा विश्वास आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी 6 जून रोजी मी माझी पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. त्या अगोदर राज्य सरकारने मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य कराव्यात. नरेंद्र मोदींवर नाराज असण्याचा प्रश्न नाही. त्यांनी मला नेहमी सन्मान दिला. हे सगळे असले तरी एक खासदार म्हणून आमच्या भावना मांडणे चुकीचे नाही, असेही संभाजीराजे म्हणाले.