TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 31 मे 2021 – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाग्रस्तांची संख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिलेत. त्यानुसार कोरोनाग्रस्तांची संख्या कमी संख्या असलेली शहरे आणि जिल्ह्य़ांत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत, अशी माहिती पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली.

महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, काही जिल्ह्यांत संसर्गाचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. तेथील पॉझिटिव्हिटी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली. आहे.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहरामध्ये सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवारी ते शुक्रवारी सुरू राहतील. तर, शनिवारी व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार आहेत. त्यासह शहरातील उद्याने, व्यायामशाळा (जिम), हॉटेल बंद राहणार आहेत. केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे.

हा आदेश पुढील दहा दिवसांसाठी असणार आहे. आता २ वाजेपर्यंत नागरिकांसाठी सर्व सेवा सुरू राहणार आहेत. पण, त्यानंतर नागरिकांनी बाहेर पडू नये. पीएमपीएमएल बससेवा अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी सुरू राहणार आहेत. इतर नागरिकांना त्याद्वारे प्रवास करता येणार नाही, असेही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.