TOD Marathi

; पंतप्रधान मोदी यांनी दिल्या शुभेच्छा

टिओडी मराठी, कोलकाता, दि. 5 मे 2021 – तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सलग तिसऱ्यांदा तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी भाजपला धूळ चारली. भाजपने या निवडणुकीसाठी सर्व शक्ती पणाला लावली होती.

या शपथविधीनंतर राज्यपाल धनकर यांनी ममता यांचे अभिनंदन केले आहे. सध्या चाललेला हिंसाचार थांबवून पुन्हा एकदा शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करण्यास सांगितले आहे. या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

मागील दोन दिवसांत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जणांचा मृत्यू झाला आहे, असे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लवकर हा हिंसाचार थांबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

या दरम्यान, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांच्या शपथविधी सोहळ्यावर टीकास्त्र सोडले होते. नड्डा म्हणाले, ‘ते शपथ घेऊ शकतात. प्रत्येकाला लोकशाहीने हा अधिकार दिला आहे. पण, आम्हीही ही शपथ घेतो की, आम्ही बंगालमधल्या राजकीय हिंसाचाराचा नायनाट करु’.