टिओडी मराठी, पुणे, दि. 5 मे 2021 – मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यक नाही. मराठा समाज मागास नसून गायकवाड आयोगाचा अहवाल स्विकारहार्य नाही, असं मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. यामुळे मराठा तरुण पिढीवर याचा दूरगामी परिणाम होणाराय, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश टेळे-पाटील यांनी दिली आहे.
महेश टेळे-पाटील पुढे म्हणाले कि, बाकीच्या राज्यांना वेगळा न्याय व महाराष्ट्राला वेगळा न्याय का? सरकारमधील आरक्षणाचा एक देखील समर्थक नाही. राजकिय नेत्यांना इतर समाजाशी असलेली नाळ तोडायची नाही, त्यांना माहीत आहे मराठा समाज कुठे जात नाही.या अविर्भावात सर्व राजकीय नेत्यांनीच मराठा समाजाचे अतोनात नुकसान केलं आहे.
मराठा समाजाचा वापर करून स्वतःची तुमडी भरून घेत कुठल्याही नेत्याला मराठा समाजाचे काही देणे घेणे राहिले नाही. स्वतःची आमदारकी, खासदारकी आणि मंत्री पदे महत्वाची वाटत आहेत. अशा सगळयांनी मराठा समाजाला फरफटत घेऊन जात आहे, त्यामुळेच मराठा आरक्षण रद्द झाले आहे. जे उच्च न्यायालयात टिकले तेच आरक्षण सर्वोच्च न्यायालय रद्द केले, या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असेही महेश टेळे-पाटील यांनी म्हंटले आहे.