सोमवारी संध्याकाळपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. (Heavy rain in Mumbai in last 2 days) दोन दिवस मुसळधार बरसल्यानंतर बुधवारी दुपारनंतर मुंबईत पावसाने थोडा ब्रेक घेतला होता. मुंबईकरांना दोन दिवसांनी काही वेळ सूर्यदर्शनही झाले. काल सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत सांताक्रूझ येथे ३१.८, तर कुलाबा येथे २४.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
मुंबईमध्ये जुलैच्या अवघ्या सहा दिवसांमध्ये सांताक्रूझ येथे ६३४.३ मिलीमीटर, तर कुलाबा येथे ४८१.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने पुन्हा एकदा शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. हवामान विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, कोकण विभागात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक पाऊस लांजा येथे ८२३ मिलीमीटर नोंदला गेला. पालघर (शेती) केंद्रावर गेल्या सहा दिवसांमध्ये ६५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल मुंबईच्या सांताक्रूझ केंद्रावर पावसाची नोंद झाली आहे.
पुढील पाच दिवसांमध्येही कोकण विभागात तसेच सह्याद्रीलगतच्या परिसरामध्ये पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Rain in Mumbai and various parts of Maharashtra) मुंबई आणि ठाण्यामध्ये रविवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. पालघरमध्ये शुक्रवारी पावसाचा जोर वाढून तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार, तर काही ठिकाणी अती तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. नाशिकच्या घाट परिसरात पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरातही काही ठिकाणी अती तीव्र मुसळधार पावसाची शक्यता पुढील दोन दिवसांसाठी वर्तवण्यात आली आहे. (Possibility of heavy rain in Pune, Kolhapur, Satara)