TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 30 जुलै 2021 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होणार आहे, अशी शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना 31 जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करा, असा आदेश दिला आहे. त्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने आज दुपारी २ वाजता १२ वीचा निकाल जाहीर करणार आहे. मात्र, अद्याप राज्याच्या शिक्षण मंडळाने शेवटचा एक दिवस उरलेला असतानाही अजून निकालाबाबत घोषणा केली नाही. त्यामुळे आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करुन उद्या निकाल लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा शिक्षण विभागाने अखेर जाहीर केलाय. मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावीतील गुण आणि बारावीच्या वर्षांतील कामगिरी ग्राह्य़ धरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य मंडळाला २८ दिवसांत निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना दिली होती.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, सीबीएसईसहीत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करावेत, असे आदेश दिले होते. न्यायालयाने दिलेली वेळेची मर्यादा लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षण मंडळ बारावी निकाल २०२१ ची आज घोषणा केली तर उद्या निकाल जाहीर होईल, अशी शक्यता आहे.

यंदा महाराष्ट्र एचएससी परीक्षा २०२१ साठी साधारण १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीय. या विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresults.nic.in वर जाहीर करण्यात येणार आहे.

असे आहे निकालाचे सूत्र –
बारावीचा निकाल जाहीर करताना ३०+३०+४० असे सूत्र निश्चित केले आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विषयांतील गुणांच्या आधारे ३० टक्के गुण देतील.

अकरावीच्या अंतिम परीक्षेच्या आधारे ३० टक्के गुण दिले जातील. तर बारावीच्या वर्षांत शाळांनी घेतलेल्या चाचण्या, सराव परीक्षा, सत्र परीक्षा, प्रात्यक्षिक यांच्या आधारे ४० टक्के गुण देणार आहेत.

पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थ्यांचा असा लावणार निकाल –
पुनर्परीक्षार्थी आणि बाहेरून परीक्षा देणारे (१७ क्रमांकाचा अर्ज भरणारे) विद्यार्थी यांचा निकाल दहावी आणि बारावी या दोनच वर्षांच्या आधारे जाहीर करणार आहे. त्यानुसार दहावीतील गुणांना ५० टक्के आणि बारावीतील गुणांसाठी ५० टक्के असा भारांश निश्चित केला आहे.

पुनर्परीक्षार्थीचे याअगोदर बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विषय ग्राह्य़ धरले जाईल. पुनर्परीक्षार्थी याअगोदरच्या परीक्षेत एकाही विषयांत उत्तीर्ण नसल्यास आणि खासगीरीत्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या वर्षांतील स्वाध्याय, चाचण्या यांआधारे मूल्यांकन केले जाणार आहे.