उद्धव ठाकरे राजीनामा देणार नाहीत; काय घडलं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत?

मुंबई :
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेसोबत महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. सरकार अल्पमतात येईल अशी परिस्थिती आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) मंत्रिमंडळ बैठकीत राजीनामा देतील असा अंदाज लावला जात होता. मात्र, ते राजीनाम्याचा निर्णय घेणार नसल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मिळाली आहे. (Uddhav Thackeray will not resign; The state cabinet meeting ended)

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर महाविकास आघाडीतर्फे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाबाबत चर्चाच झाली नसल्याची माहिती आहे. नियमित विषयावर चर्चा करीत बैठक संपल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे किंवा आमदारांनी केलेल्या बंडखोरीवर कोणतीही चर्चा केली नसल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळासमोर असलेल्या नियमित विषयावर निर्णय घेऊन ही बैठक संपली.

राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा सध्या विचार नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांना सांगितल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. काँग्रेस (Congress) नेते कमलनाथ यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर ही माहिती समोर आली. आता सरकारचे कामकाज सुरू असून लगेच राजीनाम्याचा निर्णय घेणार नसल्याचेही संकेत मिळाले आहे.

Please follow and like us: