TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 ऑगस्ट 2021 – मुंबई आणि महाराष्ट्रातील हजारों गोविंदा पथकांना गोपाळकाल्याचे वेध लागले आहे. 31 ऑगस्ट रोजी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडीचा उत्सव आहे. पण, सध्या कोरोनाचं संकट लक्षात घेता जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊया, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोविंदा पथकांशी ऑनलाइन बैठकीमध्ये संवाद साधला.

महाराष्ट्र राज्यातील गोविंदा पथकांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. या बैठकीत त्यांनी आपली बाजू मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आणि त्यांची संपूर्ण बाजू समजून घेत मुख्यमंत्री आणि प्रशासनाने आपलीही बाजू मांडली आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊया. मानवता दाखवू देऊया आणि कोरोनाला पहिले हद्दपार करूया, असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आज ते राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधत होते. बैठकीस उपस्थित प्रतिनिधींनी देखील या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेणार असल्याचे सांगितले आहे.