टिओडी मराठी, लातूर, दि. 14 जुलै 2021 – लातूर शहर महानगरपालिकेने कोरोनाग्रस्तांवर उपचारांना प्राधान्य देऊन विलगीकरण केंद्रांच्या माध्यमातून ६८६० रुग्णांवर मोफत उपचार केलेत. बाधित रुग्णांना वैद्यकीय उपचारासह औषधी, रक्त तपासणीसह दोन वेळचे जेवणही मोफत दिले आहे. या रुग्णांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असते तर त्यांना सुमारे २७ कोटी रुपये खर्च करावे लागले असते. लातूर महानगरपालिकेच्या सुविधांमुळे लातूरकरांचे २७ कोटी रुपये वाचले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये यंदा मार्च-एप्रिलमध्ये या आजाराने कहर केला. कोरोनाचा संसर्गमुळे नागरिक हवालदिल झाले होते. यावेळी लातूर महानगरपालिका नागरिकांच्या पाठीशी उभी राहिली. शहरात अनेक रुग्णालये फुल्ल होती.
अशावेळी लातूर महानगरपालिकेने समाज कल्याणचे वसतिगृह आणि पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले.यामधून बाधित रुग्णावर मोफत उपचार केले.
विलगीकरणासह ऑक्सीजन बेडची सुविधाही या केंद्रांत उपलब्ध करून दिली होती. तज्ञ डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफ महापालिकेने पुरवला होता. शहर आणि परिसरातील ६८६० रुग्णांनी या दोन केंद्रांमधून उपचार घेतले.
शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना याचा लाभ झाला आहे. समाज कल्याणच्या वसतीगृहामध्ये १५३५ तर, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ५३२५ बाधित रुग्णांवर उपचार केले.
रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार व्हावेत, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील होती. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना संपूर्ण वैद्यकीय उपचार आणि औषधी मोफत दिले. याशिवाय रक्त तपासणीसाठीही शुल्क घेतले नाही. रुग्णांना एक वेळ नाश्ता, काढा तसेच दोन वेळचे पौष्टिक जेवणही मोफत दिले आहे.
कोरोना काळ पाहता वैद्यकीय उपचार महागले होते. अशा स्थितीत बाधित रुग्णांनी हेच उपचार खाजगी रुग्णालयात घेतले असते तर त्यांना सुमारे २७ कोटी रुपये खर्च आला असता, असा अंदाज लावण्यात येत आहे.
मात्र, लातूर महानगरपालिकेने या सर्व सुविधा अगदी मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे लातूरकरांचे २७ कोटी रुपये वाचले आहेत. लातूर मनपाच्या सुनियोजित कार्याची राज्य पातळीवर दखल घेतली आहे .
लातुरकरांच्या आरोग्या सेवेस सर्वोच्च प्राधान्य – महापौर विक्रांत गोजमगुंडे
कोरोना काळात शहरातील प्रत्येक नागरिक सुदृढ रहावा, यासाठी मनपा प्रयत्नशील होती. कोरोनाची बाधा झाली तरी नागरिकांना योग्य उपचार, तेही मोफत मिळावेत, यासाठी मनपाने कोविड केअर सेंटर सुरू केली.
या माध्यमातून बाधित रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करून त्यांना दिलासा दिला. लातूरकरांच्या आरोग्या सेवेला मनपाचे प्रथम प्राधान्य राहिले आहे.
मनपाची स्वतःची आर्थिक परिस्थिती बिकट असताना विकासकामाला काही काळ बाजूला ठेवून आरोग्य सुविधा सक्षम केली. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रबळ कार्यक्षमतेने लातूरकरांना उत्तम सुविधा दिल्या आहेत, असे मत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले आहे.