देशातील महान गायिका, गानसरस्वती, भारतरत्न लता मंगेशकर यांचे ९२व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. आपल्या स्वर्गीय सुरांनी अनेक गीतांना अजरामर करणाऱ्या लतादिदींनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी देशभर पसरताच संपूर्ण देशभरात शोकाची लाट पसरली असून त्यांच्या जाण्याने संगीतविश्व, कलाविश्व पोरके झाल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून आणि दिग्गजांकडून देण्यात येत आहे.
गेल्या महिन्याभरापासून सुरु होते उपचार…
दिनांक ८ जानेवारी रोजी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लतादीदींवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, काही दिवसांनंतर त्या कोरोनातून बऱ्या झाल्या होत्या. तसेच, त्यांची तब्येतही सुधारल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून देण्यात आली होती. परंतू, कोरोनानंतर त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती, त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून कळविण्यात आले होते.
लतादीदींची तब्येत अचानक खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना शुक्रवारी आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवले होते. ‘लतादिदींची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. आणि तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत’, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. मात्र, अखेरीस उपचारादरम्यान ९२ वर्षीय भारतरत्न लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली.
गाणकोकीळेचा जीवनप्रवास…
मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर या दांपत्याच्या घरात इंदौर येथे दिनांक २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांनी जन्म घेतला . अगदी लहान वयापासूनच लतादिदींनी गायनास सुरुवात केली. पुढे अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळवत त्यांनी सिनेक्षेत्रात प्रवेश केला. आणि नंतर बॉलिवूड, मराठी या सिनेक्षेत्रासह अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या गोड आवाजाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
अनेक दशके त्यांनी आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मने जिंकली नाही तर त्यांच्या हृदयावर देखील राज्य केले. लता मंगेशकर यांनी त्यांच्या जीवनात हजारो गाणी गायली, ज्यातील काही गाणी लतादिदींप्रमाणे तसेच त्यांच्या सुरांप्रमाने अजरामर आहेत. लतादिदींनी अगदी लहानपणापासूनच संगीत हेच आपले आयुष्य बनवले होते. संगीत, जे कधी आपल्याला हसवते तर कधी आपल्या डोळ्यातून अश्रु आणते. अशा दोन्ही आवाजांची देणगी लता मंगेशकर यांना लाभली होती. याच सुरांच्या देणगीने लतादीदींनी लाखो रसिकांच्या, त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.