अगदी रामायण, महाभारत या मालिकांपासून पौराणिक मालिका प्रचंड चालतात, हा दूरचित्रवाणीचा इतिहास आहे. अलिकडे जय जय स्वामी समर्थ असेल किंवा बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिका हिट होत्याच. आता एक नवी मालिका दाखल होत आहे. ती आहे योग योगेश्वर जय शंकर. कैलासपती शंकराची ही कथा आहे. त्यांनी योगेश्वर महाराजांच्या रूपात धरतीवर जन्म घेतला, अशी श्रद्धा आहे. यात अग्गबाई सूनबाई मालिकेतली सून उमा पेंढारकर पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहे. आपल्या योग योगेश्वर जय शंकर मालिकेतल्या भूमिकेबद्दल उमा सांगत होती, ‘याआधी स्वामिनी मालिकेत मी पार्वतीबाई पेशवे ही भूमिका केली होती. आता योग योगेश्वरमध्ये मी पार्वतीच साकारतेय. दोन्ही भूमिकेत एक समान धागा आहे. तो म्हणजे दोन्ही स्त्रिया या आईपण जपणाऱ्या आहेत आणि प्रचंड देवभक्त आहेत.’
ती पुढे म्हणाली, ‘यात मी योगेश्वर महाराजांची आई आहे. ही भूमिका मला मिळणं माझं भाग्य समजते. योगेश्वर महाराजांचे विचार आणि कार्य प्रेक्षकांपर्यंत नेण्याचं चांगलं काम माझ्या भूमिकेतून होणार आहे. म्हणून मी खूश आहे. या भूमिकेचा अभ्यासही मी करतेय. त्यावर कामही करतेय. मी जबाबदारीनं ही भूमिका करेन, एवढं नक्की.’ उमा पेंढारकरबरोबर योग योगेश्वर जय शंकर मालिकेत शंकर महाराजांच्या वडिलांच्या भूमिकेत अतुल आगलावे आहेत. तर आरुष बेडेकर बाल शंकर महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. कलर्स मराठीवर ३० मेपासून योग योगेश्वर जय शंकर ही मालिका सुरू होत आहे.