ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन

kirti shiledar

पुणे: संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं आज(शनिवार) पहाटे निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७० व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
२०१८ साली झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं, त्यावेळी त्यांची एकमताने निवड झाली होती. मराठी रंगभूमी तेवत ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी फार मोठं योगदान दिलं आहे. संगीत रंगभूमी पुन्हा जोमाने बहरून येईल असा विश्वास त्या नेहमी व्यक्त करायच्या. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी संगीत आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जवळपास सहा दशकांच्या आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर एक वेगळाच ठसा उमटवला होता. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Please follow and like us: