नवी दिल्ली: विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात नोकरी आणि बेरोजगारीबाबत सात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी केजरीवाल यांनी तरुणांना रोजगाराबाबत देखील मोठी आश्वासनं दिली आहे. आप राज्यातील तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध करून देईल. प्रत्येक घरातील एका बेरोजगार व्यक्तीला शासकीय नोकरी मिळेल आणि कामाच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना ३ हजार रुपये भत्ता मिळेल, अशी घोषणा केजरीवाल यांनी दिली आहे.
राज्यातील ८० टक्के नोकऱ्या गोव्यातील रहिवाशांसाठी राखीव असतील. आम आदमी पार्टीने केलेल्या ट्विटनुसार, गोव्यासाठी पक्षाने मोठ्या घोषणा केल्या आहेत. पर्यटन क्षेत्रात करोनामुळे बेरोजगार झालेल्यांना दरमहा पाच हजार रुपये आणि खाणीचं काम थांबल्याने बाधित झालेल्या लोकांना दरमहा पाच हजार रुपये दिले जातील, अशीही घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिनांक २० सप्टेंबर रोजी गोव्यात तरुणांना नोकऱ्या मिळत नसल्याचा दावा केला आहे. त्याचसोबत, येथील स्थानिक लोकांशी या विषयावर चर्चा करण्यासाठी अरविंद केजरीवाल राज्याला भेट देणार आहेत.