नवी दिल्ली | पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदादने (javed miandad) पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. जोपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) भारतीय संघास पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी पाठवत नाही, तोपर्यंत पाकिस्ताननेही भारताचा दौरा करू नये. अगदी आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी देखील पाकिस्तानने संघ पाठवू नये, असे वक्तव्य जावेद मियाँदाद यांनी केले आहे.
आशिया कपसाठी ‘बीसीसीआय’ने अखेरीस संमिश्र प्रारूप आराखडा स्वीकारल्यावर पाकिस्तानचा भारतात विश्वचषक खेळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. सामन्याचे संभाव्य वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार भारत-पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार असल्याची शक्यता आहे. मात्र, मियाँदाद यांनी या सगळय़ाला विरोध केला आहे.
‘‘पाकिस्तान संघाने २०१२ आणि त्यानंतर चार वर्षांनी म्हणजेच २०१६ मध्ये भारताचा दौरा केला होता. त्यामुळे आता भारतीय संघाने पाकिस्तानात येण्याची वेळ आहे. या संबंधांतील निर्णय माझ्या हातात असता, तर मी कधीच पाकिस्तानला भारतात खेळण्याची परवानगी दिली नसती. आम्ही भारताशी खेळायला कायम तयार असतो. पण भारत कधीच तयार नसतो,’’ असेही मियाँदाद म्हणाले.
‘‘पाकिस्तानातील क्रिकेट खूप मोठे असून, दर्जेदार कामगिरीचा इतिहास आहे. अनेक दिग्गज खेळाडू पाकिस्तानने दिले आहेत. त्यामुळे भारतात खेळले नाही, तर आपल्या क्रिकेटवर फार काही परिणाम होणार नाही,’’ असेही मियाँदाद यांनी सांगितले.
भारताने आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने २००८ मध्ये पाकिस्तानचा अखेरचा दौरा केला होता. त्यानंतर या दोन देशांमधील संबंध कायमच तणावपूर्ण राहिल्याने आजपर्यंत एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेलेली नाही.