TOD Marathi

मुंबई | आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. “जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील,” असं मोठं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे.

शिरसाट पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा का पुळका आला, हे मला कळायला मार्ग नाही. जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत. ज्या पक्षाची स्थापना मुळात गद्दारीतून झाली, ते आम्हाला गद्दारीची भाषा शिकवत आहेत. हे सर्व हास्यास्पद आहे. याची आम्ही अजिबात चिंता करत नाही.”

“शरद पवारांनी राजीनामा दिल्यावर जयंत पाटील का रडत होते? कारण, उद्या काय घडणार याची माहिती जयंत पाटलांना होती. म्हणून ते रडत होते. शरद पवारांनी राजीनामा दिला म्हणून जयंत पाटील रडत नव्हते. काही दिवस वाट पाहा, जयंत पाटलांचं मार्गक्रमण कुठेतरी झाल्याचं दिसेल,” असेही संजय शिरसाटांनी सांगितलं.

तर एकीकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला आज एक वर्ष झालं. यानिमित्ताने शिवसेनेकडून (शिंदे गट) ‘स्वाभीमान दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघाला हा दिवस ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, यासाठी पत्र लिहिलं आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही राज्यात ‘गद्दार दिन’ साजरा केला जात आहे.