टिओडी मराठी, दि. 4 ऑगस्ट 2021 – स्वदेशी बनावटीच्या ‘विक्रांत’ या विमानवाहू युध्दनौकेच्या सागरी परिक्षणांची सुरुवात होणार आहे. भारताच्या सर्वात जटील यंत्रणा असलेल्या ‘विक्रांत’ या विमानवाहू युध्दनौकेची बांधणी भारतीय नौदलाच्या कोचीन शिपयार्डमध्ये संपूर्ण स्वदेशी पद्धतीने केली आहे. स्वदेशी विमानवाहू युध्दनौकेची रचना आणि बांधणी यशस्वी होणे, ही देशासाठी मोठी सफलता आहे, असे केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हंटलं आहे.
विक्रांत नौकेवरील दिशादर्शक यंत्रणा, संपर्क यंत्रणा आणि मुख्य सांगाड्यातील साधने यांच्या परीक्षणासोबत नौकेला पाण्यावर प्रवास करण्यासाठी आवश्यक यंत्रणेचे कठोर परीक्षण केले जाणार आहे.
बंदराच्या ठिकाणी या नौकेवरील विविध साधनांचे परीक्षण केल्यानंतर या स्वदेशी विमानवाहू युध्दनौकेचे प्रत्यक्ष सागरी परीक्षण करता येणे, विशेषतः कोविड-19 च्या कठीण काळात हे शक्य करणे, हे देशासाठी मोठे यश आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या मजबूत पाठींब्याने कोचीन शिपयार्डच्या बांधणी गोदामामध्ये ऑगस्ट 2013 मध्ये स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू नौकांच्या बांधणीची सुरुवात झाली. त्यामुळे भारताचे विमानवाहू जहाजांची रचना आणि बांधणी करण्याची क्षमता असणाऱ्या देशांच्या गटात प्रवेश केला होता.
‘विक्रांत’ या स्वदेशी विमानवाहू युध्दनौकेची मूळ रचना भारतीय नौदलाच्या नौदल रचना संचालनालयाने देशात विकसित केलीय. तसेच या नौकेची संपूर्ण तपशीलवार अभियांत्रिकी रचना, बांधणी व त्यावरील प्रणालींचे एकत्रीकरण हे सर्व काम कोचीन शिपयार्ड मर्यादित या कंपनीने केलं आहे.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विमानवाहू नौकेच्या आकाराच्या जहाजाचे संपूर्ण त्रिमितीय मॉडेल तयार केले आहे. या त्रिमितीय मॉडेलच्या आधाराने निर्मितीसंबंधी आरेखने तयार केली आहे.
‘विक्रांत’ विषयी –
‘विक्रांत’ या स्वदेशी विमानवाहू युध्दनौकेची बांधणी देशात केली आहे.तिचे वजन सुमारे 40,000 टन इतके आहे. ही विमानवाहू युध्दनौका म्हणजे एक तरंगते शहर आहे. विमानांच्या परिचालनासाठी असलेल्या तळाचे क्षेत्रफळ दोन फूटबॉल मैदानांच्या एकत्र क्षेत्रफळा एवढे आहे.