TOD Marathi

‘Indian Oil’ने कमावला 22 हजार कोटींचा नफा; मागील 3 वर्षातील उच्चांकी कमाई

टिओडी मराठी, दि. 21 मे 2021 – देशामधील सर्वात मोठी ऑईल उत्पादक कंपनी असलेल्या इंडियन ऑईलने मार्च 2021 अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात 21 हजार 836 कोटी रुपयांचा अधिक नफा कमावला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत नफ्यामध्ये 20 हजार 523 कोटी रुपयांनी वाढ झालीय. मागील 3 आर्थिक वर्षातील ही उच्चांकी कमाई ठरलीय. नुकताच इंडियन ऑईलचे चेअरमन श्रीकांत वैद्य यांनी इंडियन ऑईलचा ताळेबंद जाहीर केलाय.

एप्रिल ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षात ५ लाख १४ हजार ८९० कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न जमा झालेत. मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ५ लाख ६६ हजार ३५४ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळाले होते.

महसुली उत्पन्न ५० हजार कोटी रुपयांवरून घटूनही नफ्यात मोठी वाढ झालीय. मार्च २०२० अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात १ हजार ३१३ कोटी नफा झाला होता. त्यामध्ये २१ हजार ८३६ कोटी रुपयांपर्यंत वाढ झालीय.

पेट्रोकेमिकल उत्पादनांत अधिक नफा मिळाल्याने एकूण नफ्यात वाढ झालीय. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळातील पहिल्या तिमाहीत १ हजार ९११ कोटी रुपयांचा नफा झाला. या तिमाहीत कोरोनाचे निर्बंध कडक असल्याने त्याचा परिणाम ताळेबंदावर दिसून येत आहे.

सप्टेंबर २०२० अखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत ६ हजार २२७ आणि डिसेंबर २०२० अखेरीस संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ४ हजार ९१७ कोटींचा नफा कमावलाय. तर, मार्च २०२१ अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत सर्वाधिक ८ हजार ७८१ कोटी रुपयांची कमाई केली.

असा वाढला नफा :
मार्च २०२० अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात प्रति बॅरल ढोबळ नफा ०.०८ डॉलर इतका होता. त्यामध्ये मार्च २०२१ मध्ये सुमारे ५.६४ डॉलरची वाढ झालीय. त्यामुळे एकूण नफा वाढला असल्याचे दिसून येत आहे.

कंपनीने मिळवलेला नफा : (रक्कम कोटी रुपये)
२०१८-१९ – १६,८९४
२०१९-२० – १,३१३
२०२०-२१ – २१,८३६