TOD Marathi

भारत डिसेंबरपर्यंत ‘अशा पद्धतीने’ लसीकरण पूर्ण करणार; कोविड टास्क फोर्सचा ‘असा आहे’ रोडमॅप

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 मे 2021 – देशात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. लसीकरणाअभावीमुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. देशात निर्माण झालेल्या लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर एक चांगले वृत्त समोर आले आहे. डिसेंबरपर्यंत भारत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करता येईल, एवढ्या लसी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. विनोदकुमार पॉल यांनी दिली आहे.

ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान २१६ कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. तसेच प्रत्येक भारतीयाचे लसीकरण केल्यानंतरही पुरेसे डोस शिल्लक राहतील, असेही डॉ. विनोदकुमार पॉल यांनी सांगितले आहे.

गुरुवारी (ता.१३) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. विनोदकुमार पॉल म्हणाले की, ‘भारतीयांसाठी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान एकूण २१६ कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. आणि ही लस सर्वांना मिळेल यात शंका नाही. सरकारी आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत, देशातील नागरिकांना १७.७२ कोटींपेक्षा अधिक लसींचे डोस दिले आहेत.

जानेवारी महिन्यात भारताने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या कोविशिल्डला लसीकरणासाठी मान्यता दिलीय. मागील महिन्यात रशियाच्या स्पुतनिक-५ ला भारतात आपत्कालीन वापरास परवानगी देण्याची शिफारस केली होती.

डॉ. विनोदकुमार पॉल म्हणाले की, स्पुतनिक-५ लस भारतात दाखल झालीय, हे सांगताना मला आनंद होत आहे. रशियाकडून लसींचा मर्यादित पुरवठा होत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून स्पुतनिक लस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल, अशी आम्हाला आशा आहे.

कोविड टास्क फोर्सचा रोडमॅप तयार
यावेळी डॉ. विनोदकुमार पॉल यांनी लसींच्या रोडमॅपशी संबंधित आकडेवारी सादर केली. फायझर-बायोएनटेक, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, मॉडर्ना आणि चीनची सिनोफार्म या लसींची नावे वगळली आहेत. एप्रिल महिन्यामध्ये सरकारने अशा लसींच्या तातडीच्या वापरासाठीच्या शिफारशींना मान्यता दिली होती.

अमेरिका, युरोप, जपान व ब्रिटनच्या नियामकांनी या लसींच्या वापराला ग्रीन सिग्नल दिलाय. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन वापराच्या यादीत समाविष्ट असलेल्या लसींचा या यादीत समावेश आहे.

कोविड टास्क फोर्सचा 213 कोटी लसींचा रोडमॅप :
कोविशिल्ड : ७८ कोटी डोस
कोवॅक्सिन : ५५ कोटी डोस
बायो ई सबयुनिट लस : ३० कोटी डोस
झायडस कॅडिला डीएनए : ५ कोटी डोस
नोवावॅक्स : २० कोटी डोस
भारत बायोटेक इंट्रानेजल : १० कोटी डोस
जिनिव्हा mRNA : ६ कोटी डोस
स्पुतनिक-५ : १५.६ कोटी डोस