TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 मे 2021 – कोरोनामुळे देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलंय. देशातील महत्त्वाच्या अशा परीक्षा रद्द केल्या आहेत तर काही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा हि कोरोनाच्या सावटाखाली आहे. देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता हि परीक्षा देखील रद्द करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.कारण कोरोना परिस्थिती सुधारण्यास वेळ लागणार आहे.

दरम्यान CBSE बोर्डाकडून आणखी आठवडाभर सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे, असे समजत आहे. त्यानंतर पुढे ढकललेल्या परीक्षा घ्यायच्या की रद्द करायच्या याबाबत निर्णय घेतला जाईल. शिक्षण मंत्रायलातील सूत्रांच्या हवाल्याने एका इंग्रजी प्रसारमाध्यमाने हे वृत्त दिले आहे.

मीडिया अहवालानुसार, परीक्षा रद्द करून असेसमेंट आधारीत योजना विद्यार्थ्यांसाठी आखली जाणार आहे. शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिलीय.

सध्याची कोरोनाची परिस्थिती आधीपेक्षा चारपट वाईट आहे, अशी प्रतिक्रिया सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. त्यांच्या मते, या शैक्षणिक सत्रासाठी शाळा बंद राहतील. परीक्षांबाबत अंतिम निर्णय एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जूनमध्ये घेण्यात येईल. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा होण्याची शक्यता कमी आहे.

मीडिया अहवालानुसार, कोरोना काळात CBSE बोर्डाच्या परीक्षा घ्याव्या की नाहीत? याबाबत शिक्षण तज्ज्ञांमध्ये दुमत आहे. देशातील काही महत्त्वाच्या शिक्षण संस्थांमधील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे जूनमध्ये हि या परीक्षा होण्याची शक्यता धूसर आहे.

अशावेळी परीक्षा रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही आहे. तर, काही तज्ज्ञांच्या मते, जरी आणखी सहा महिने थांबावं लागलं तरी चालेल तरी परीक्षा होणं गरजेचं आहे. CBSE चे माजी चेअरमन अशोक गांगुली यांच्या मते, ही परिस्थिती निश्चितच सुधारेल व आपण जुलैमध्ये बारावीच्या परीक्षा घेऊ.

काही शिक्षण तज्ज्ञांच्या मते, ऑनलाइन परीक्षा हा देखील एक पर्याय आहे. या दरम्यान हा काळ विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तणावाखाली असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम पालकांनी करणं अपेक्षित आहे.