दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटाच्या आमदारांची आणि नेत्यांची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीत शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानाबाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचे की नाही याबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याची (BKC Ground) तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे. शिवसेनेच्या पारंपरीक दसरा मेळावा घेण्याचीही घोषणाही करण्यात आली. दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानावर दावा केला होता. मैदानाचा हा वाद हायकोर्टात गेल्यानंतर शिवसेनेला या मेळाव्यासाठी परवानगी मिळाली. शुक्रवारी हायकोर्टाचा निकाल येण्याआधीच शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर मेळावा घेण्यास परवानगी मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत शिंदे गटातील मुंबई, ठाणे आणि जवळच्या जिल्ह्यातील आमदार हजर राहणार आहेत. या बैठकीत दसरा मेळाव्याबाबत पुढील रणनिती ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाजी पार्क मैदानाबाबत हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचे का, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सोबतच या मेळाव्यासाठी मोठी गर्दी जमवण्यासाठीची रणनिती ठरवण्यात येणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिंदे गटाने सभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. जेसीबीच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार नसल्याची देखील चर्चा आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने बीकेसी मैदानासाठी एमएमआरडीएकडे आधीच अर्ज दाखल केला होता. त्यानंतर शिवाजी पार्क मैदानासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला. हायकोर्टात सुनावणी होण्याआधीच एमएमआरडीएने शिंदे गटाला मेळाव्यासाठी मैदान दिले. मात्र. मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतर मुंबई महापालिकेच्या या निर्णयाला शिवसेनेने हायकोर्टात आव्हान दिले होते.