शिवाजी पार्कसाठी सुप्रीम कोर्टात? शिंदे गटाची आज बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत शिंदे गटातील मुंबई, ठाणे आणि जवळच्या जिल्ह्यातील आमदार हजर राहणार आहेत. या बैठकीत दसरा मेळाव्याबाबत पुढील रणनिती ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाजी पार्क मैदानाबाबत हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचे का, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सोबतच या मेळाव्यासाठी मोठी गर्दी जमवण्यासाठीची रणनिती ठरवण्यात येणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिंदे गटाने सभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. जेसीबीच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार नसल्याची देखील चर्चा आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने बीकेसी मैदानासाठी एमएमआरडीएकडे आधीच अर्ज दाखल केला होता. त्यानंतर शिवाजी पार्क मैदानासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला. हायकोर्टात सुनावणी होण्याआधीच एमएमआरडीएने शिंदे गटाला मेळाव्यासाठी मैदान दिले. मात्र. मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतर मुंबई महापालिकेच्या या निर्णयाला शिवसेनेने हायकोर्टात आव्हान दिले होते.

Leave Your Comment