TOD Marathi

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला एक फोटो ट्विट केला आणि हा फोटो ट्वीट करत त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. सदर फोटो मॉर्फ केलेला आहे. सुप्रिया सुळे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे म्हणत याविरोधात आदिती नलावडे (Aditi Nalawde) यांनी वरळी पोलीस ठाण्यातील सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी आक्रमक झाल्यानंतर शितल म्हात्रे यांनी मात्र घुमजाव केलं आहे. हा फोटो खरा असल्याचा आपण कुठेही दावा केला नसल्याचे शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांचा एक फोटो ट्विट केला होता. यामध्ये श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे दिसत होते. त्यानंतर आता शिंदे गटातील शितल म्हात्रें यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या मागे मुख्यमंत्र्यांचा बोर्ड दिसत आहे. यामध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचे दिसत आहे. हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ?? असा प्रश्नही शीतल म्हात्रेंनी उपस्थित केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत त्यांच्या या ट्वीटचा विरोध केला आहे. हा बदनामीचा डाव असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. याबाबत बोलताना शीतल म्हात्रे म्हणाल्या की, मी दावा केलेला नाही तर मी प्रश्न विचारलाय की कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला सुप्रिया सुळे यांचा फोटो शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी ट्विट केला आहे. हा फोटो मॉर्फ केलेला फोटो आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न केला आहे. त्यामुळे याविरोधात मी वरळी पोलीस ठाण्यातील सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली आहे. याविरोधात कारवाई होईल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे आदिती नलावडे यांनी म्हटलं आहे.