टिओडी मराठी, मुंबई, दि. 8 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाणही कमी झालं आहे. यावर राज्य सरकारने 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केलं. मात्र, पुढील दोन महिने धोक्याचे आहेत, असे मत राज्याच्या टास्क फोर्सन व्यक्त केलंय. अशात उद्या कोविड टास्क फोर्सची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे.
सामान्य मुंबईकरांना लोकल ट्रेनमधून प्रवास करायला मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. दोन लस डोस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवास मुभा द्यावी, ही मागणी केली जातेय. त्यामुळे टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय होणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला.
त्याचप्रमाणे हॉटेल व्यावसायिकांना हि वेळ वाढवून हवी आहे. राज्यातील कोरोना रुग्ण संख्या व विविध भागात काय सूट दिली जाऊ शकते? याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.
पुढील दोन महिने धोक्याचे- कोविड टास्क फोर्स राज्य सरकारने राज्यातील निर्बंध शिथिल केलं असले तरीही पुढचे दोन महिने धोक्याचे आहे, असे मत टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडलं आहे. कोरोनाला नष्ट करण्यासाठी मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याचं लक्ष्य आहे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय.
महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे निदानाचे प्रमाण कमी आहे. कोरोना संसर्ग कमी होतोय. मात्र, कोरोना पूर्णपणे गेला नाही. हि गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. येत्या काळ म्हणजेच पुढील दोन महिन्यांचा काळ हा संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
येत्या दोन महिन्यामध्ये बरेच सण आणि उत्सव आहेत. त्यामुळे राज्यामध्ये शिथिल केलेल्या निर्बंधांचे परिणाम येत्या दोन आठवड्यांत लक्षात येतील, असे कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं आहे.
याअगोदर निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरिकांच्या वागण्यामुळे संसर्ग वाढल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे हा अनुभव लक्षात घेऊन येत्या काळात अधिक सतर्कपणे वागले पाहिजे, असेही शशांक जोशी म्हणालेत.