पुणे:
पुण्यातील (Pune) गणपती विसर्जन (Ganapati Visarjan 2022) मिरवणूक याचिका हायकोर्टानं (Bombay High Court) फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. तर विसर्जन तोंडावर असताना स्वैर याचिका करणं चुकीचं असल्याचंही सरकारनं कोर्टात सांगितलं आहे.
पुण्यातील गणपती विसर्जनाचा सोहळा आता काही दिवसांवर आला आहे. अशातच मानाच्या मिरवणुकींवरून सुरु झालेल्या वादावरील याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) या प्रकरणी सुनावणी पार पडली. पुण्यात मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक झाल्यानंतर अन्य मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्याच्या परंपरेला यावेळी ‘बढाई समाज ट्रस्ट’चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात आव्हान दिलं होतं. या अटी आणि परंपरा संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे, असा दावा करत बढाई यांनी कोर्टात आव्हान दिलं होतं. मानाच्या गणपतीआधी छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी होती. हायकोर्टात याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. हायकोर्टानं मात्र ही याचिका फेटाळून लावली.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक ही राज्यभरातील भाविकांच्या आकर्षणाचं मोठं केंद्र असतं. पुण्यातील हजारो मंडळं आकर्षक विसर्जन रथ तयार करून त्यावर गणपती बाप्पाला ठेऊन मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या मिरवणुकीत मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन होता होता दिवस संपून जातो. त्यामुळं इतर हजारो मंडळांना ताटकळत राहावं लागतं. पोलीस आणि प्रशासनाकडे याबाबत अनेकदा दाद मागून देखील दखल न घेतली गेल्यानं पुण्यातील गणेश मंडळांनी अखेर न्यायालयात याचिका दाखल केली होती.