TOD Marathi

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहूमधील अधीश बंगल्यासंदर्भात (Adhish Bungalow) महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील (Juhu Adhish Bunglow) अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्याशिवाय, राणे यांना हायकोर्टाने 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. राणे यांचा मुंबईतील जुहूमध्ये असणारा अधीश बंगला पालिकेच्या रडारवर आला होता. अधीश बंगल्यातील काही बांधकामावर पालिकेनं (BMC) आक्षेप घेतला होता. महानगरपालिकेकडून अधिश बंगल्याची पाहणीदेखील करण्यात आली होती.

मुंबई पालिकेनं नारायण राणे यांना नोटीस पाठवून अवैध बांधकाम पाडावं, अशा सूचना केल्या होत्या. मार्च महिन्यात पाठवण्यात आलेल्या या नोटिसीच्या विरोधात राणेंनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर आता नारायण राणे यांच्या नोटीसीवर आज सुनावणी पार पडली.

दरम्यान, पालिकेच्या नोटिसीला उत्तर देताना नारायण राणेंचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मातोश्रीवर हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री बंगल्यातील अवैध बांधकामाकडे पालिका दुर्लक्ष करते आणि ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना टार्गेट केलं जातं, अशा आशयाचा आरोप नितेश राणे यांनी केला होता.