TOD Marathi

दिल्ली:
राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे आणि म्हणून हवामानात बदल झाला आहे. मान्सूनच्या अरबी समुद्रातील प्रवेशानंतर पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात दमदार हजेरी लावल्यानंतर आता हा पाऊस उत्तरेकडे सरकला आहे.

दिल्ली एनसीआरमध्ये दिल्ली आणि नोएडाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. आज सकाळपासून या पावसाचा जोर वाढला आहे.

जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत तर पावसामुळे अनेक विमानांच्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. दिल्लीतील अनेक महत्वाच्या भागांत पाऊस सुरु आहे. यामध्ये विजय चौकासह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी आले असल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिल्लीत काल हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होता.

उत्तरेकडील काही राज्यांमध्ये आठवडाभर असेच पावसाचे आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असल्याने समाधान व्यक्त होत आहे.