टिओडी मराठी, दि. 1 ऑगस्ट 2021 – आज मैत्री दिवस अर्थात फ्रेंडशिप डे. सर्व मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देऊन आजचा दिवस साजरा केला जातो. पण, हा मैत्रीदिवस नेमका कधी?, का आणि कुठे सुरू झाला?याबाबत आपण माहिती घेऊया.
‘फ्रेंडशिप डे’ हा दिवस तारखेनुसार नव्हे तर, दिवसानुसार साजरा केला जातो. दरवर्षी ऑगस्ट महिन्यामधील पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो.
आपल्याकडे अलिकडेच ‘फ्रेंडशिप डे’चे वारे वाहत असले तरी त्याची सुरुवात खूप जुनी आहे. ‘फ्रेंडशिप डे’ दक्षिण अमेरिकेतील देशात खासकरून पॅराग्वेत धुमधडाक्यात साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’चा प्रस्तावही 1958 मध्ये ठेवला होता. ज्यानंतर सुरुवातीच्या काळात भेटवस्तू आणि भेटकार्ड देऊन शुभेच्छा देण्यावर भर दिला होता. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ भारतासह दक्षिण अशियातील काही देशही साजरा करतात.
काही देश मात्र ‘फ्रेंडशिप डे’ त्यांच्या सोयीनुसार साजरा करतात. 8 एप्रिलला ओहायोच्या ओर्बालिनमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. तर, जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्र संघाच्या 27 एप्रिल 2011 ला पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये 30 जुलै हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे’ म्हणून अधिकृतरित्या साजरा केला होता.