TOD Marathi

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटनंतर शेअर बाजारात मोठी चढउतार झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचीही चांगली संधी आली आहे. कारण, गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा आजचा भाव ०.२५ टक्क्यांनी घसरला, तर चांदीचा भाव ०.०१ टक्क्यांनी घटला आहे.

एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा भाव आज ०.२५ टक्क्यांच्या घसरणीसह ४७,७९२ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे, तर चांदीच्या भावात ०.०१ टक्क्यांनी घसरण झाली असल्याचेही दिसून येत आहे. आज एक किलो चांदीचा भाव ६१,३५१ रुपये इतका आहे. २०२० मध्ये याच कालावधीत ‘एमसीएक्स’वर १० ग्रॅम सोन्याचा भाव ५६,२०० रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर होता. ‘एमसीएक्स’वर आज सोन्याचा डिसेंबर वायदे भाव ४७,७९२ रुपये प्रति १० ग्रॅम असून सर्वोच्च स्तरावरुन सोने अद्यापही ८४०० रुपये स्वस्त मिळत आहे.

कोरोना काळातही सोन्यात गुंतवणूक वाढली असून, त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे नुकताच भारतात सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक बनला आहे.