TOD Marathi

पुणे: भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये (National Election Committee of BJP) वर्णी लागल्यामुळे राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागलेले देवेंद्र फडणवीस हे २०२४ साली पुणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याविषयी भाजपच्या वतीने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारीला हिरवा झेंडा दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis to contest Pune Loksabha, Bramhan Mahansangh Demands to BJP) यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास मला कोणताही आक्षेप नाही, असे गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं आहे.

राजकीय पक्षाची उमदेवारी कोणाला द्यायची याचा निर्णय प्रमुख नेते घेतात. त्यासाठी एक यंत्रणा असते, अध्यक्ष असतात, निवडणूक मंडळ असते. मात्र, संघटनाच राजकीय पक्षाचा उमेदवार ठरवू लागल्या तर पेच निर्माण होऊ शकतो. असंही बापट म्हणाले. त्यांचा रोख अर्थातच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडे होता. या संघटनेने योग्य आणि अयोग्य बघून कोणाचा प्रचार करायचा, याचा निर्णय घ्यावा. पण देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी मिळाल्यास मला कोणतीही अडचण नाही. उलट फडणवीस पुण्यातून उभे राहिल्यास मला आनंदच होईल, असं देखील गिरीश बापट यांनी म्हटले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. आता ही मागणी भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व मान्य करणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.