टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 मे 2021 – कोरोनामुळे राज्यासह देशात बिकट अवस्था झाल्याची पाहायला मिळत आहे. यातच शासकीय कार्यालये देखील खूप कमी लोकांच्या उपस्थितीत सुरु आहेत. तर बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर जात येत नाही. परंतु या दरम्यान ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र संबंधित काही कामं करायची असतील, तर आपणास कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण, नव्या शासन नियमानुसार, आता वाहनचालकांना आरटीओमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सर्व आवश्यक प्रक्रिया ऑनलाईन केल्या जाणार आहेत. या अंतर्गत आपण नोंदणी प्रमाणपत्र 60 दिवस अगोदर नूतनीकरण करून घेऊ शकता.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स तयार करणे व नूतनीकरण करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत कोरोना काळामध्ये अशा कामांसाठी लोकांना आरटीओमध्ये जावे लागणार नाही. बहुतेक काम डिजिटल पद्धतीने करण्यात येतील.
आपणास जर लर्निंग लायसन्स मिळवायचे असेल तर आपणास परीक्षेच्या प्रक्रियेतून जावे लागते. परंतु कोरोना काळात परिवहन मंत्रालयाने यातून दिलासा दिला आहे. आरटीओमध्ये जाऊन चाचणी देण्याची गरज दूर केली असून आता अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकतात. ट्युटोरियलद्वारे घरी बसून त्यांना याची मदत मिळणार आहे.
कालबाह्य कागदपत्रांची मुदत 30 जूनपर्यंत वैध मानणार
ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, परमिट आदी सारखी मोटार वाहन कागदपत्रे ज्या वाहनचालकांची 1 फेब्रुवारी 2020 रोजी कालबाह्य झाली आहेत. त्यांना नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दिलासा मिळालाय. सरकारने त्यांची वैधता मर्यादा 30 जून 2021 पर्यंत वाढविलीय. अशा परिस्थितीत कालबाह्य कागदपत्रे जूनपर्यंत वैध मानली जाणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कोणतेही चलन भरावे लागणार नाही.