मुंबई: दिवाळी तोंडावर आलेली असताना इंधन दरवाढ झाली आहे. या वाढत्या महागाईमुळे पुन्हा एकदा सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे. मुंबईमध्ये तर पेट्रोलचे दर ११५ रुपयांच्या पार गेले आहेत. आज देशात पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल ३५ पैशांनी महागलं आहे.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जर सरकारनं वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत, तर मात्र लवकरच पेट्रोलचे दर १२० पार पोहोचतील. कच्च्या तेलाचं उत्पादन करणाऱ्या संघटना OPEC+ या आठवड्यात संयुक्त बैठक घेणार आहेत. या बैठकीत उत्पादन वाढवण्यावर निर्णय होऊ शकतो. जर असं झालं तर किमतींमध्ये घट होऊ शकते. दरम्यान, भारतात गरजेच्या ८० टक्के कच्चं तेल परदेशातून खरेदी केलं जातं.
मुंबईत पेट्रोलनं ११५ चा आकडा गाठला असून डिझेलही १०५ रुपयांच्या पार पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत ११५.५० रुपये आणि डिझेलची किंमत १०६.६२ रुपये प्रति लिटर आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांना या इंधन दर वाढीचा चांगलाच फटका बसत आहे.