TOD Marathi

नवी दिल्ली | पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जोरदार टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी महत्त्वपूर्ण बैठक आज, शुक्रवारी बिहारमध्ये होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने होत असलेल्या विरोधकांच्या या बैठकीस पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. परंतु काँग्रेस व आम आदमी पक्षातील विसंवाद तसेच, बहुजन समाज पक्षास या बैठकीचे आमंत्रण नसल्याने विरोधी ऐक्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

आगामी सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षांची आघाडी झाल्यास त्यांचा नेता कोण असेल हा वादाचा मुद्दा असल्याने या बैठकीत त्यावर चर्चा होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. वादग्रस्त विषय टाळून विरोधी ऐक्यासाठी ठोस पार्श्वभूमी निर्माण करणे हा या बैठकीमागील हेतू आहे. या बैठकीस १५ पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती अपेक्षित असून यामध्ये पाच ते सहा राज्यांचे मुख्यमंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव या बैठकीत सहभागी होणार आहेत. परंतु मायावती यांच्या बसपला या बैठकीचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. शिवाय, राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांनी कौटुंबिक कार्यक्रमाचे कारण पुढे करत या बैठकीतून आधीच अंग काढून घेतले आहे. दुसरीकडे, काँग्रेस व आम आदमी पक्षातील विसंवाद समोर आला आहे. दिल्ली सरकारच्या प्रशासकीय अधिकारांवर टाच आणत केंद्र सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाविरोधात लढा देण्याची हमी काँग्रेसकडून मिळायला हवी यासाठी आम आदमी पक्ष आग्रही आहे. काँग्रेसने ही हमी न दिल्यास आम्ही या बैठकीतून बाहेर पडू, असा इशारा आपतर्फे गुरुवारी देण्यात आला.

मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, भगवंत मान, एम. के. स्टॅलिन, हेमंत सोरेन, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, खा. शरद पवार आदी नेते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.