टिओडी मराठी, पुणे, दि. 13 जून 2021 – दिल्लीमध्ये सहायक आयुक्त असल्याचे सांगत दारु विक्री परवान्याच्या नावाखाली 40 लाख 43 हजाराची फसवणूक केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
शुभम गौर आणि रूजना गौर अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परमेश्वर कुचेकर (33,रा.कोथरुड) यांना आरोपी शुभम गौर याने एस.सी.टी.दिल्ली येथे सहायक आयुक्त पदावर काम करत आहे, असे सांगितले.
तसेच बनावट ओळखपत्र दाखवून विश्वास संपादन केला. यानंतर हडपसर येथे सदनिका घेण्यासाठी पैशाची गरजेचे असल्याचे सांगितले.
फिर्यादीसोबत शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात समजुतीचा करारनामा करुन फिर्यादी आणि त्याच्या मित्रांकडून वेळोवेळी 40 लाख 43 हजार रुपये घेतले. यानंतर फिर्यादीला बनावट दारु विक्री परवाना आणि वाईन बार परवाना दिला.
परवाना बनावट असल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पैशाची मागणी केली. मात्र, त्याला पैसे परत न देता फसवणूक केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंढे करीत आहेत.